देशात खूप मोठ्या संख्येने शेतकरी आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांचे तीन भाग करून वर्षभर दिले जातात.
आता २०वा हप्ता म्हणजेच विसावा हप्ता लवकरच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे जाणार आहेत, आणि तिथेच हप्त्याचे वितरण होईल अशी शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत:
- पहिला हप्ता: एप्रिल ते जुलै
- दुसरा हप्ता: ऑगस्ट ते नोव्हेंबर
- तिसरा हप्ता: डिसेंबर ते मार्च
या वेळापत्रकानुसार हप्ता दिला जातो. १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मिळाला होता. आता चार महिने झालेत, म्हणून शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.
या योजनेचा लाभ कोणाला?
फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. जर कुणाकडे शेती नाही, किंवा डॉक्टर, इंजिनिअर, १०,००० पेक्षा जास्त पेन्शन घेणारे किंवा कर भरणारे असतील, तर त्यांना हा लाभ मिळत नाही.
यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे. आधार कार्ड आणि बँक खातं जोडलेलं असावं लागते. शेतकऱ्यांनी आपले सर्व कागदपत्र वेळेवर अपडेट ठेवायला हवेत.
देशभरातील १० कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत ३.६४ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
महाराष्ट्रात विशेष फायदा:
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान योजनेचा नव्हे, तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतूनही वर्षाला ६००० रुपये मिळतात. त्यामुळे एकूण १२,००० रुपयांची मदत त्यांना मिळते.
शेवटी, हे लक्षात ठेवा की पंतप्रधानांच्या हस्ते मोठा कार्यक्रम होऊन हप्ता जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांत पैसे हळूहळू खात्यात जमा होतील. कधी कधी दोन दिवस उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक खाते आणि आधार अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे.
ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत ठरली आहे. सरकारकडून सांगण्यात येत आहे की, पुढच्या काळात ही योजना अजून पारदर्शक आणि सोपी केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ जरूर घ्यावा.